शनिवार, २५ जानेवारी, २०२५

आंतरजालावर कुणीतरी चुकते आहे, त्यांना इंगा दाखवून येतो


एक्सकेसिडी नावाचे एक प्रचलित संकेत स्थळ आहे तिथे अंकीय जगावर आणि एकूणच समकालीन मुद्यांवर मार्मिक टीका असणारे कार्टून असतात.  त्यातलेच एक गमतीदार पण मार्मिक चित्र हे आहे ज्यात दाम्पत्यामधले एकजण दुसऱ्याला ते आंतरजालावरचे काम थांबवून झोपायला बोलावते आहे त्याला उत्तर देतांना ती व्यक्ती म्हणतेय थांब हे खूप महत्वाचे आहे, आंतरजालावर कुणीतरी चुकीचे बोलतेय किंवा चुकतेय.
मतितार्थ असा की आता ती व्यक्ती स्वतःचा बराच वेळ आणि उर्जा त्या कुणातरी व्यक्तीला त्यांची चूक दाखवण्यात आणि एकूणच आंतरजालाचे कल्याण करण्याच्या कामात भरपूर वेळ घालवणार असते.  आपण काय मिळवतोय आणि काय घालवतो आहे याचा विचार या वेळेस सहसा आपण करत नसतो. व्यवस्थापन शास्त्रात याला घावललेल्या संधीची किंमत [१] म्हणतात.  जेव्हा आपण एक पर्याय निवडतो तेव्हा आपण त्याच वेळेत आणि त्या उर्जेत केल्या जाऊ शकणारे अनेक पर्याय नाकारत असतो.  भावनेच्या भरात आपण जर जागे राहणे, आणि आंतरजालावरचे क्षुल्लक वादविवादात (आपल्याला ते त्यावेळी क्षुल्लक वाटत नसतात) वेळ घालवणे महत्वाचे समजत असू तर आपण कदाचित तब्येतीची हेळसांड करतोय, प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवायचा सोडून त्यांना डावलतोय हे समजून घेत नसू तर आपण खूप मोठी घावललेल्या संधीची किंमत मोजतोय हे आपल्याला समजत नाही.



धूर दिलेले रेड हेरिंग मासे [२] यांचा तीव्र आणि उग्र वास सुटतो.  शिकारी कुत्र्यांना त्यांच्या लक्षापासून विचलित करण्यासाठी आणि त्यांचा दिशाभ्रम करण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे वाचायला मिळते, त्यापासूनच रेड हेरिंग हे एका लक्ष विचलित करण्याच्या युक्तीला मिळालेले नाव आहे. असे रेड हेरिंग आपल्या आयुष्यात पदोपदी पेरलेले असतात आणि आपल्याला ते न कळल्यामुळे भरपूर किंमत चुकवावी लागते.
आंतरजालावर कुणीतरी चुकतोय आणि त्यात आपला वेळ जातोय हे परिस्थितीने आपल्या मार्गात पेरलेले रेड हेरींग आहे नाही का?
काही वर्षांपूर्वी वाचलेली एक मीम मला आठवते की मुख्य परीक्षेच्या आधी एक हुशार विद्यार्थी वसतीगृहाच्या सर्व खोल्यांच्या दारातून गेम ऑफ थ्रोन या प्रसिद्ध धारावाहिकाच्या डिविडी सरकावतो आणि मनात म्हणतो आता यांची रात्र हे उत्तान धारावाहिक पाहण्यात जाणार आणि माझा अभ्यास कमी झाला तरीही मला यांचा अभ्यास अपुरा झाल्याने अधिक गुण मिळणार.  हे रेड हेरिंग चे एक झकास उदाहरण आहे.
आपल्या बाबतित असे कुणी दुष्ट सहपाठ्याने काही करायची पण परिस्थिती येणार नाही कदाचित पण आपणच काही मोहांना बळी पडून आपल्याच आयुष्यातल्या काही मोलाच्या संधी गमावत असतो आणि हारवलेल्या संधीची किंमत मोजत असतो.  विचार करून पाहता कितीतरी अश्या घटना आपल्याला आठवतील जिथे आपल्याला वेळ आणि उर्जा खर्च करायची तितकी आवश्यकता नव्हती पण ती खर्च झाल्याने त्याच वेळात आणि उर्जेत होऊ शकणाऱ्या अनेक गोष्टी राहून गेल्या.
पुढच्या आठवड्यात तुमची परीक्षा असेल आणि जर तुम्ही आंतरजालावरच्या कुण्या मित्राबरोबर काही धर्मांमध्ये कसे चुकीचे समज असतात आणि त्यावर काय केले गेले पाहिजे असे मुद्दे चर्चेला घेऊन त्यावर गुगल मधे शोध घेऊन बरेच काही वाचत सुटला असाल, तर तेव्हा तुमचा वेळ आणि उर्जा खरेच त्या आठवड्यात या विषयावर खर्च व्हायला हवा का याचा विचार तुमच्या मनात येत नाही.  हे एक रेड हेरिंग आहे हे पण आपल्याला कळत नाही.
जेम्स क्लियर च्या ऑटोमिक हॅबिट्स पुस्तकात त्याने एक महत्वाची कल्पना मांडलीय त्यात ते म्हणतात की फक्त सवयी जोपासू नका, तुमची ओळख तुम्हाला काय घडवायची आहे ते आधी ठरवा म्हणजे तुम्हाला तुमची भावी ओळखच काय करायचे आणि काय नाही याचे मार्गदर्शन करेल, तुमची भावी ओळख तुमचा दिशादर्शक ध्रृवतारा बनेल.  जर मला एक ऐशी टक्के किंवा अधिक गुण मिळवणारा स्नातक अशी ओळख हवी असेल तर माझी ती भावी ओळख मला प्रत्येक कृती करायच्या आधी ती ओळख तयार करण्यासाठी ही कृती सहाय्यक आहे की मारक याचा विचार करायला लावेल आणि मला असे मार्गात येणारे रेड हेरिंग ओळखता येतील असे वाटते.
रोज काही क्षण थांबून आढावा नक्की घ्यावा की माझी भावी ओळख मला काय हवी आहे आणि ती मिळवण्यात माझ्या सध्याच्या कृती सहाय्यक आहेत की मारक आहेत.  असे सातत्याने केलेले आत्मावलोकन आपल्याला अनेक रेड हेरींग यांच्या चकव्यातून बाहेर काढायला मदत करेल.

#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५

संदर्भ:
  • [१] संधीची किंमत – अपॉर्च्यूनिटि कॉस्ट
  • [२] धूर दिलेले – स्मोक्ड रेड हेरींग

(सावध झालेला)
तुषार जोशी
नागपूर, शनिवार २५ जानेवारी २०२५





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: