तिन भाषा बोलता वाचता येतात आणि आणिक काही भाषा आता प्राथमिक स्वरूपात लिहिता वाचता येतात याचाच अर्थ आपण बहुभाषाविद होण्याच्या मार्गावर अग्रेसर झालोत ही मला एक छान सुरवात वाटतेय. घरातल्या अनेकांना किंवा मित्रगटात एकच नवी लिपी वाचता येऊ लागली की ती एक गुप्तसंदेश वाहक लिपी ठरते याचे गमतीदार अनुभव मला आलेले आहेत.
धनवटे रंगमंदीर च्या सभागृहात उस्ताद क़मर हयात यांचेकडून जेव्हा आम्ही नव्वद च्या दशकात उर्दू शिकायला जायचो तेव्हा अपर्णा, महेश, प्रसन्न यांचेबरोबर मला उर्दू लिहिण्याची नस्तालीक लिपी यायला लागली होती तेव्हा मला आठवते की मी पोस्टकार्डावर नस्तालीक लिपीमधे महेश ला पत्रे पाठवली होती आणि मजा म्हणजे त्या लिपीत मी मराठी मजकूर लिहून ते पाठवले होते. तसे करायचा पण एक थरार वाटला होता. त्याकाळात शिकण्याची साधने सीमित होती आणि बऱ्याच प्रयत्नांनी ती मिळायची.
सध्या आंतरजालीय संसाधनांमुळे अनेक साधने आणि शिक्षक मुक्तपणे उपलब्ध झालेले आहेत. सामग्री निर्माता[२] हे एक अनोखे कौशल्य आणि व्यवसाय सध्या विकसित झालेला आहे आणि त्या सामग्री निर्मात्यांच्या योगदानाने अनेक नवी कौशल्ये आणि अनेक शिक्षक आपल्याला मिळालेले आहेत.
असेच माझे सध्या एक आवडते शिक्षक आणि सामग्री निर्माते आहेत नेलसन डेलीस. अमेरिकेचे विश्व स्मृती स्पर्धांमधे अनेक वर्षे सातत्याने प्रथम आणि नाबाद असलेले नेलसन त्यांच्या सामग्री निर्माण करण्याच्या योगदानामुळे ते माझे आवडते स्मरणसहाय्यक सूत्र[१] शिक्षक आहेत. त्याच्यां वेळ देऊन तयार केलेल्या अनेक युट्यूब दृकश्राव्य धड्यांमुळे बरेच नवे शिकायला मिळते आणि माझ्यासारख्या दृष्य माहिती साठवून न ठेवता येणाऱ्या व्यक्तीस स्मृतीसहाय्यक सूत्रांद्वारे आणि गोष्टींच्या माध्यमातून नवी माहिती आणि कौशल्ये लक्षात ठेवण्यास मदत होते.
इतक्यातच त्यांचा एक दृकश्राव्य धडा पाहायला मिळाला त्यात त्यांनी ब्रेल लिपी शिकवली आणि ती लक्षात ठेवायचे सोपे स्मृतीसहाय्यक सूत्र शिकवले. अवघ्या पंधरा मिनिटांच्या त्यांच्या धड्यातून मला ब्रेल लिपी वाचता यायला लागली. आपल्याला अनेक भाषांच्या लिपी आता कळतात या आनंदात एक अजून लिपी आज शामिल झाली. देवनागरी (मराठी, हिंदी, संस्कृत), बंगाली, नस्तालिक (अरबी, फारसी, उर्दू), हिरागाना, काताकाना, कांजी (जपानी) यांच्या जोडीला आता मला ब्रेल लिपी देखील येते ही खूप सुखावणारी उपलब्धी आहे.
मी सवयीने लगेच ब्रेल लिपी मधे लिहायचे आणि वाचायचे साहित्य शोधणे सुरू केले आहे, मला ब्रेल लिपीतली पुस्तके वाचायला आवडतील त्यामुळे त्यांची माहिती देखील मिळवायची आता इच्छा आहे. या कौशल्याचा वापर करून ब्रेल मधे भेटकार्ड लिहून तयार करायचा पण एक प्रकल्प आता मनात आकार घेतो आहे. नेलसन डेलीस यांचे स्मरणसहाय्यक सूत्र इतके प्रभावी आहे की मी त्या सूत्राव्दारे माझ्या मुलींना बोलता बोलता ब्रेल लिपी शिकवली देखील आणि आता आमच्यात ही सुद्धा एक गुप्तसंदेश लिपी झाली आहे.
याच निमित्ताने मी दृष्टीवंचित समाजासाठी काही करू शकलो तर ते विकल्प समजून घ्यायला आणि माझ्यातर्फे जमेल तसे योगदान करायला मला आवडेल. आपल्या हातून काही चांगले घडायचे असले की आपल्याला त्यासाठी हवी ती कौशल्ये येऊन भेटतात अशी माझा विश्वास नक्कीच आहे.
तुम्ही माझ्या निकट मित्र गटात असाल तर मी आनंदाने तुम्हाला ब्रेल शिकवायला तयार आहे. अगदी ऑनलाईन देखील सत्र आयोजित करता आले तर मी त्यात ब्रेल शिकवायला तयार आहे. नेलसन डेलीस यांचा तो दृकश्राव्य धडा त्यांच्या युट्यूब वाहिनीवर आहेच तिथे इंग्रजी मधे ते शिकायला मिळेलच, मी मराठीत ते शिकवू शकेन हेच माझे त्यात योगदान.
खुणांची भाषा शिकायची इच्छा होती पण या ब्रेल शिकायला मिळाल्यामुळे ध्वनीवंचित समाजाच्या आधी दृष्टीवंचित समाजास उपयोगी पडणारी भाषा शिकायला मिळाली, खुणांची भाषा शिकायला अधिक वेळ द्यावा लागणार आहे, पण ते पण सुरू आहे. या भाषा आणि लिपी शिकायला हव्यात असे मला उत्कटतेने वाटते कारण त्याने संपर्काची अनेक नवी दालने खुली होतात.
तळटिपा:
- [१] स्मरणसहाय्यक सूत्र – नेमोनिक्स
- [२] सामग्री निर्माता – कंटेंट क्रियेटर
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२५
(बहुभाषाभ्यासी)
तुषार जोशी
नागपूर, सोमवार, २७ जानेवारी २०२५